केज दि.२३ – उसाची काकरी का मोडली अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एका वृद्ध शेतकऱ्यास औताच्या रुमन्याने मारून पाय मोडल्याची घटना केज तालुक्यातील भाटुंबा येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भाटुंबा येथील शेतकरी संभाजी छबुराव चवरे ( वय ६५ ) हे बारा जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतातील घरासमोर उभे असताना आरोपी ऋषिकेश गुंडीबा चवरे, सीताराम वसंत चवरे, ओमकार बळीराम चवरे, महादेव दगडोबा चवरे, सुदर्शन गुंडीबा चवरे, योगेश सीताराम चवरे हे संगनमत करून आले. त्यांनी तुझ्या नात सुनाने उसाची काकरी का मोडली असे विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत ऋषिकेश याने औताच्या रुमन्याने मारहाण करीत संभाजी चवरे यांचा पाय मोडला. तर वरील इतर आरोपींनी संभाजी चवरे व त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना लाथाबुक्याने मारहाण करीत मुक्कामार दिला. उपचारानंतर २३ जून रोजी संभाजी चवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश चवरे, सीताराम चवरे, ओमकार चवरे, महादेव चवरे, सुदर्शन चवरे, योगेश चवरे या सहा जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.