केज दि.२४ – शेतात कापूस लागवड करीत असलेल्या महिलेस शिवीगाळ करीत लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी केज पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय महिला ही २३ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास तिच्या शेतात कापूस लावत होती. याचवेळी शहाजी वैजनाथ आंधळे, रामा वैजनाथ आंधळे, मारूती आघाव, कांचन शहाजी आंधळे ( सर्व रा. कोल्हेवाडी ता. केज ) या चौघांनी येऊन तू आमच्यावर रोज दहा केस कर, आम्हाला काहीच फरक पडत नाही असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण केली. रामा आंधळे याने तू नवऱ्याजवळ नांदत नाहीस असे म्हणत वाईट हेतूने साडी ओढत विनयभंग केला. तर मारुती आंधळे याने हाताच्या दंडाला चावा घेत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून शहाजी आंधळे, रामा आंधळे, मारूती आघाव, कांचन आंधळे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे या पुढील तपास करत आहेत.