अंबाजोगाई दि.२४ सख्या चुलत भावानेच भावाची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार अंबाजोगाईत समोर आला आहे.दारू पिल्यानंतर दोन भावांमध्ये वाद झाले आणि या वादाचे रूपांतर खुनात झाले असल्याचे समोर आले.मंगळवारी (दि.२२) सायंकाळी हा प्रकार घडला असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संतोष लालासाहेब चव्हाण (वय ३५, आ. बेलदार वस्ती, क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या मयताचे नाव आहे. संतोषची पत्नी गंगुबाईच्या फिर्यादीनुसार, संतोषला दारूचे व्यसन होते. संतोष आणि त्याचा चुलत भाऊ शिवाजी बळीराम चव्हाण या दोघात दारू पाजण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असत. मंगळवारी सकाळपासूनच ते दोघे मद्यपान करून सोबत होते. सायंकाळी ५ वाजता संतोषच्या घरासमोर मद्यधुंद अवस्थेत दोघे विनाकारण भांडत होते.
यावेळी भांडणात शिवाजीने संतोषला बेदम मारहाण करत खाली पाडले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. हे पाहून गंगुबाईने आरडाओरडा केला असता इतर नातेवाईक धावत आले आणि त्यांनी संतोषला स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगुबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चव्हाण याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिवाजी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत.