कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगाच्या काळजीत वाढ करण्यास सुरुवात केलीय. आता जागतिक आरोग्य संघटनेने देखील या विषाणूबाबत इशारा दिलाय. कोरोनाच्या व्हेरिएंटपैकी डेल्टा व्हेरिएंट आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्ग करणारा विषाणू असल्याचं निरिक्षण WHO ने नोंदवलंय. ज्या लोकांनी कोरोना विरोधी लस घेतलीय त्यांनीही सावधान राहून मास्क (Mask) घालणं सुरू ठेवण्याचा सल्ला डब्लूएचओने दिलाय. धोकादायक आणि वेगाने संसर्ग होणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठी फिजीकल डिस्टन्सिंगचं कठोर पालन व्हायला हवं. मास्कचा वापर आणि इतर निर्बंधाचीही कठोर अंमलबजावणी करायला हवी, असंही मत जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवलं आहे.
डब्लूएचओचे अधिकारी मरियांगेला सिमाओ म्हणाले, “कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेत म्हणून लोकांनी निर्धास्त किंवा निष्काळजी होऊ नये. त्यांना अजूनही कोरोना विषाणूचा धोका कायम आहे. लस घेतलेले एकटे समुह संसर्ग रोखू शकत नाही. नागरिकांनी सातत्याने मास्कचा वापर करायला हवा. मोकळ्या हवेच्या ठिकाणी राहायला हवे. गर्दी करणं टाळलं पाहिजे आणि हात नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी हे सर्व करणं तितकंच आवश्यक आहे. कारण डेल्टा व्हेरिएंट खूप वेगाने संसर्ग करत असल्याचं समोर आलंय.
दरम्यान“लस घेतलेल्या लोकांनीही खबरदारी घ्यायला हवी. डेल्टा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे. अनेक देशांमध्ये या विषाणूने लाखो लोकांना बाधित केलंय. दुसरीकडे जगातील मोठ्या प्रमाणात नागरिकांना लस देणं बाकी आहे. लस घेतलेले नाही अशा नागरिकांमध्ये डेल्टा संसर्ग अधिक वेगाने होताना दिसत आहे,” असंही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलं. डेल्टा विषाणू सर्वात आधी भारतात आढळला. त्यानंतर तो जगभरात अनेक ठिकाणी पोहचलाय. आतापर्यंत या विषाणूने जवळपास 85 देशांमध्ये संसर्ग केलाय.