पुणे दि.२७ – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्याआधीच लहानगे आणि त्यांच्या पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अमेरिकन औषध कंपनी नोव्हाव्हॅक्सने तयार केलेल्या कोव्होवॅक्स लसीच्या चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर होणार चाचणी आहे. देशात लहान मुलांवर केली जाणारी ही चौथी चाचणी ठरणार आहे. 2 ते 11 वर्ष आणि 12 ते 17 वर्ष अशा दोन वयोगटातील 920 लहान मुलांवर चाचणी होणार आहे. जुलै महिन्यात चाचणीला सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात 12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना लस दिली जाईल. देशभरात 10 ठिकाणी सीरमच्या कोव्होवॅक्स लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे.अमेरीकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने कोव्होवॅक्स ही कोव्हिडवरील लस तयार केली आहे. सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांवरील वयोगटासाठीही कोव्होवॅक्स लस बाजारात आणण्याची तयारी सीरम करत आहे.
दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नोव्हाव्हॅक्सने सीरम इन्स्टिट्यूटसोबत NVX-CoV2373 या कोरोना लसीसाठी उत्पादन करार करण्याची घोषणा केली होती. ही लस कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटवर प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. सिम्प्टमॅटिक कोव्हिड रोखण्यात 90 टक्के, तर मध्यम स्वरुपाची लक्षणे रोखण्यात ही लस 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला होता.याआधी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला लहान मुलांवर क्लिनीकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. नागपुरात लहान मुलांवर या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती.