विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी शिक्षकांनी शर्थीचे प्रयत्न केले.बँकांनी नियमाचा हवाला देत १० वर्षे वयोगटाच्या सामान्यतः इयत्ता पहिली ते तिसरी आतील विद्यार्थ्यांचे खाते काढलेले नाहीत.तर ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते यापूर्वी काढलेले आहे, अशा खात्यात नियमित किमान सहा महिन्यांतून एकदा व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उघडलेल्या बँक खात्यात किमान शिल्लक नसल्याने दंड आकारणी होते. त्यामुळे ज्यावेळी कोणतीही रक्कम जमा केली जाते, अशावेळी सर्वप्रथम दंडाची आकारणी कपात केल्याने लाभार्थींचे नुकसान होणे अपेक्षित आहे. यामुळे शिक्षकांना पालकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.
किती रक्कम जमा होणार…..?
विद्यार्थ्यांच्या खात्यात केवळ उन्हाळी सुट्टी कालावधीतील रक्कम जमा करावयाची आहे. दोन महिन्यांतील अंदाजित कार्य दिवस ३५ गृहीत धरल्यास इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दर दिवशी ४.४८ रुपये दराने एकूण फक्त १५६ रुपये ८० पैसे आणि इयत्ता सहा ते आठसाठी दर दिवशी ६.७१ रुपये दराने एकूण फक्त २३४ रुपये ८५ पैसे जमा होतील. त्यामुळे गतवर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीचा पोषण आहार विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शाळेतून वितरित करण्यात आला, तीच पद्धती योग्य आहे. मात्र, संदर्भित आदेशानुसार प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे सर्व संबंधित यंत्रणेसाठी अत्यंत जिकिरीचे आहे. बँक व्यवस्थापनाचे विद्यार्थ्यांचे खाते काढण्याबाबत नकारार्थी धोरण अधिक अडचणी वाढविणारे आहे.