सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आल्या असून, त्या विद्यार्थीकेंद्रीत, कृतीकेंद्रीत तसेच अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. विद्यार्थी याद्वारे स्वयंअध्ययन करू शकतील. तसेच सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर ३ चाचण्या देण्यात आल्या असून, शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन/ऑफलाईन सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सेतू अभ्यासक्रमाद्वारे प्रत्येक वंचित घटकांपर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून शाळा बंद असल्या तरी विद्यार्थी शिकत राहतील, असे कडू यांनी यावेळी सांगितले.
सेतू अभ्यासक्रम राबविण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून काटेकोरपणे करावी, अशा सूचना विभागीय शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यानया उपक्रमांतर्गत जुनी पाठ्यपुस्तके उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यांनी ती शाळेत जमा करू नये, अशा सूचना शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, अनेक शाळा आणि मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या जुनी पाठ्यपुस्तके जमा करण्याच्या आधीच्या निर्देशानुसार पुस्तके याआधीच जमा करून घेतलेली आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तके जमा केली आहेत ते पुढील दीड महिना उजळणी कशी करणार? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. शिक्षण विभागाच्या स्वतःच्याच निर्णयात होत असलेल्या अशा गोंधळामुळे शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम आहे.