मुंबई दि.२ – महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.
इयत्ता 10 वीच्या गुणांवर 30 टक्के भारांश देण्यात आला असून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील. इयत्ता अकरावीच्या गुणांवर 30 टक्के भारांश असून इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तर बारावीच्या वर्गासाठी 40 टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तत्सम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.
दरम्यान बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यालयांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.