मुंबई दि. 3 – गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीने जगभर थैमान घातलं आहे. या कोरोना काळात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. 2021 मध्ये कोरोनावर उपाय म्हणून लसीकरण करण्यास सुरवात करण्यात आली. गेल्या 6 महिन्यापासून लसीकरणाचे विविध टप्पे सुरू असतानाच लस घ्यावी की नको, असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती आहे.
भारतात सध्या 20 टक्के लोकांचं लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या भारतात दररोज सुमारे 50 लाख नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र कोरोना लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक शंका आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संदर्भात नवी माहिती दिली आहे. लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 98 टक्क्यांनी कमी होते तर, एका डोसमधून सुमारे 92 टक्के बचाव होतो, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या भारतात कोवाॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक वी या तीन लसींना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच अन्य देशांच्याही लसींना मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या लाटा आटोक्यात येण्यासाठी लसीकरण वेगवान होण्यासाची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट रोकण्यासाठी किमान 70 टक्के नागरिकांचं लसीकरण होण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आकडेवारीमध्ये लक्षणीय घट होताना दिसत आहे. परंतू डेल्टा प्लसने सर्व देशवासियांची चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. अशातच रेक्टल ब्लीडिंगचा धोका वाढला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना काळजी घेणं आवश्यक आहे.