Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, तर शहरातील मटका बुक्कीवर छापा……!

केज तालुक्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, तर शहरातील मटका बुक्कीवर छापा……!
केज दि.७ – एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील सावळेश्वर ( पैठण ) येथे ७ जुलै रोजी घडली. नानासाहेब बाबासाहेब दौंड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते.
        सावळेश्वर ( पैठण ) येथील शेतकरी नानासाहेब बाबासाहेब दौंड ( वय ३५) हे ७ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेतातून जनावरांचे शेण काढून येतो असे सांगून घरातून गेले होते. त्यांनी शेतात जाऊन त्यांच्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. नानासाहेब दौंड यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, जमादार राहुल भोसले, पोलीस नाईक पांडुरंग वाले यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. मयत शेतकऱ्याचे भाऊ शामसुंदर बाबासाहेब दौंड यांनी दिलेल्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.

केजमध्ये मटका बुक्कीवर धाड ; दोघांवर गुन्हा 

केज दि.७ –  शहरातील मंगळवार पेठेत सुरू असलेल्या मटका बुक्कीवर पोलिसांनी छापा मारून एकास अटक करीत त्याच्याकडील नगदी रक्कम, एक मोबाईल असा २८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी केज पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

केज शहरातील मंगळवार पेठ भागात पांचाळ नावाचे हॉटेलसमोर सार्वजनिक ठिकाणी बालासाहेब लिंबाजी डोईफोडे हा लोकांना जादा पैशाचे अमिष दाखवून आकड्यावर पैसे लावुन कल्याण मटका नावाचा जुगार खेळवित आहे अशी गुप्त माहिती मिळताच जमादार बाळकृष्ण मुंडे, पोलीस नाईक मंगेश भोले, पोलीस नाईक अशोक नामदास यांनी ७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता छापा मारला. यावेळी बालाजी डोईफोडे यास मटका घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून नगदी रक्कम, एक मोबाईल व मटका जुगाराचे साहित्य असा २ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने सुशील संतराम सत्वधर याच्या सांगण्यावरून मटका घेत असल्याचे सांगितले. पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून बालासाहेब लिंबाजी डोईफोडे ( रा. कासारी ता. केज ), सुशील संतराम सत्वधर ( रा. केज ) या दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शेअर करा
Exit mobile version