Site icon सक्रिय न्यूज

जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडी चे समन्स, प्रकृती बिघडल्याने पत्रकार परिषद रद्द……!

जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडी चे समन्स, प्रकृती बिघडल्याने पत्रकार परिषद रद्द……!

मुंबई दि. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी खडसेंना जावं लागणार होतं. मात्र, त्याआधी खडसे पत्रकार परिषद घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे खडसे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र खडसेंची प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

सक्तवसुली संचलनालयानं एकनाथ खडसें यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली. कसून चौकशी केल्यानंतर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली.

दरम्यान एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का?, असा सवाल खडसेंनी केला होता.

शेअर करा
Exit mobile version