कोल्हापूर दि.8 – दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून स्वतः च्या आईलाच मुलाने संपवलं; अन एवढ्यावरच थांबता आईचं काळीज काढून खाण्याचा प्रयत्नही केला. यातील आरोपी मुलाला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी फाशीची शिक्षा ठोठावली. सुनील कुचकोरवी असे या निर्दयी आरोपी मुलाचे नाव असून, कोल्हापुरात वीस वर्षानंतर फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने ह्त्येप्रकरणी केलेली टिपणी लक्षात घेऊन त्याला फाशीची शिक्षा होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सुनावणी वेळी आरोपी सुनील याने आपणास पत्नी, चार मुले असल्याने कुटुंबाची जबाबदारी असून खूप मोठी शिक्षा करू नये, अशी क्षमायाचना न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, या प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार वकील विवेक शुक्ल यांनी काम पहिले. कोल्हापूर येथे छत्रपती ताराराणी पुतळ्याजवळ माकडवाला वसाहत आहे. येथे मयत यलव्वा कुचकोरवी ही आपल्या मुलासह राहत होती. तिचा मुलगा सुनील कुचकोरवी हा व्यसनाधीन होता. तो वारंवार आईशी भाडंण करत होता. त्याने २८ ऑक्टोबर २०१७ रोजी आईकडे दारूसाठी पैशाची मागणी केली.आई पैसे देत नसल्याच्या रागातून त्याने धारदार शस्त्रांनी निर्दयपणे आईचा खून केला. इतक्यावरच न थांबता या बेभान झालेल्या नराधमाने आईच्या शरीरातील अवयव बाजूला काढून त्यातून काळीज शिजवून खाण्याचा क्रूरपणा केला होता. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली होती. त्यांनी गुन्हाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणी दरम्यान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी सुनील कुचकोरवी याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील शुक्ल यांनी १२ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून शिक्षा सुनावली आहे. यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश परीट, एम एम नाईक यांचे सहकार्य लाभले. हा तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे व त्यांच्या पथकाने अतिशय तांत्रिक कौशल्याच्या आधारे केला होता या तपास कार्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर शैलेश बलकवडे यांनी या पथकाला पंधरा पंधरा हजार रुपयांची बक्षीस जाहीर केले.