मुंबई दि.10 – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वाभूमीवर राज्यात निर्बंध शिथिल करण्याची तसेच शाळा सुरू करण्याची घाई करू नका, असा इशारा करोना संदर्भातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या कृती गटाने दिला आहे.कोरोनाच्या विषाणूचा नवा उपप्रकार निर्माण झाल्याची भीती तसेच लोक मोठ्याप्रमाणात रस्त्यावर बाहेर पडत असल्याने तिसऱ्या लाटेचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, गर्दीच्या ठिकाणी आणि घरोघरी चाचण्या करण्यावर अधिक भर द्या. शाळा सुरू करण्याच्या घाईमुळे मुलांना संसर्गाचा धोका वाढला असून लहान मुलांबाबतची विशेष मार्गदर्शक तत्वे जाहीर होत नाहीत तोवर किमान ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करू नका, अशा सूचना कृती गटातील तज्ज्ञांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्याच्या बहुतांश भागातील करोनाची साथ नियंत्रणात आली असली तरी सर्व प्रयत्न करूनही कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील लाट नियंत्रणात येत नसल्याने सरकारची झोप उडाली आहे. अहमदनगरमधील पारनेरसह कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत करोनाच्या विषाणूचा नवा प्रकार निर्माण झाल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त झाल्यानंतर या संवेदनशील जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून पार पडली. आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, करोना कृती गटाचे डॉ. संजय ओक, डॉ. सुहास प्रभू, डॉ. शंशाक जोशी आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, बुलढाणा या जिल्ह्यांतील साप्ताहिक बाधितांचे प्रमाण हे राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील करोना संसर्गाची स्थिती चिंताजनक आहे. तर काही ठिकाणी करोनाचे नवीन विषाणू दिसून येत आहेत याबाबत बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांनी पुढील काळात हा संसर्ग वाढू नये, यासाठी कृती गटाच्या मदतीने नियोजन करण्यात यावे अशा सूचना आरोग्य विभागास दिल्या. राज्य शासनाने उद्योजकांबरोबर चर्चा करून करोना नियम पाळून कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.