Site icon सक्रिय न्यूज

मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ बीड नंतर आता अहमदनगर जिल्ह्यात राजीनामा सत्र…….!

मुंडे भगिनींच्या समर्थनार्थ बीड नंतर आता अहमदनगर जिल्ह्यात राजीनामा सत्र…….!

बीड दि.११ – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काही तासांतच बीडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे भगिनींना डावललं जात असल्याचा आरोप करत राजीनामास्त्र उगारल आहे. शनिवारी अचानक भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे.

                      शनिवारी (१० जुलै) बीड जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्याबरोबरच अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपाच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीसुद्धा आपल्या राजीनामा दिला आहे. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.
                      बीड जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यमप्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २५ पदाधिकार्‍यांनी शनिवारी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.
शेअर करा
Exit mobile version