जालना दि.११ – मागच्या कित्येक दिवसांपासून व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. निर्बंध पूर्णतः काढून पूर्ण दिलासा द्यावा किंवा पूर्ण कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, त्या भागात निर्बंध जाहीर करावेत, मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी आणि निर्बंध काढून टाकण्यात यावेत. ही बाब मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. शहरांमध्ये नुकतेच सुरु होत असलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद झाले. रात्रीपर्यंत सुरू असणारी दुकानं दुपारी 4 वाजता बंद करण्याचे निर्बंध लागू झाले. त्यामुळे सरकारवर व्यापारी वर्गातून नाराजी असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.