Site icon सक्रिय न्यूज

कॉलेजेस सुरू करण्यास हरकत नाही मात्र शाळा सुरू करण्याची घाई करू नये -ना.राजेश टोपे

कॉलेजेस सुरू करण्यास हरकत नाही मात्र शाळा सुरू करण्याची घाई करू नये -ना.राजेश टोपे

जालना दि.१२ – राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसली तर रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याच कारणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन शाळा सुरु कराव्यात का यावर चर्चा करण्यात येत आहे. मात्र, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी सध्या शाळा सुरु करु नयेत असं म्हटलं आहे. तसेच सध्या 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये सुरु करण्यास हरकत नाही, असेही ते म्हणाले आहेत. टोपे रविवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाल्यामुळे सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच कारणामुळे आता राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात अशी मागणी काही पालकांकडून केली जात आहे. राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले होते. या सर्वेक्षणात अनेक पालकांनी शाळा सुरू कराव्यात असे दर्शवले होते. मात्र, राजेश टोपे यांनी सध्याच शाळा सुरु करणे योग्य होणार नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान अजूनही लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचेही राजेश टोपे यांचे मत आहे.

शेअर करा
Exit mobile version