Site icon सक्रिय न्यूज

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात आयएमए चा इशारा……! 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात आयएमए चा इशारा……! 

नवी दिल्ली दि.१२ – भारतीय वैद्यकीय संघटनेनं (IMA) देशातील सर्व राज्य सरकारांना कोरोना प्रादुर्भावासंदर्भात मोठा इशारा दिला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये जास्त सूट दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना आयएमएनं राज्यांच्या सरकारांना दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका विसरुन चालणार नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेआधी देशात जास्तीत जास्त लोकसंख्येचं कोरोना विरोधी लसीकरण करणं अतिशय गरजेचं असल्याचंही आयएमएनं नमूद केलं आहे. देशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन काटेकोर पद्धतीनं केलं जात नसल्याच्या मुद्द्यावरही आयएमएनं बोट ठेवलं आहे आणि देशात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन झालं नाही तर देशाला तिसऱ्या लाटेला निश्चितपणे सामोरं जावं लागेल, असा स्पष्ट इशारा आयएमएनं राज्यांना दिला आहे.

                      आपल्याला तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अतिशय काळजीपूर्वक पावलं टाकण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारा संदर्भात गेल्या दीड वर्षातील आपल्या अनुभवानुसार एक गोष्ट लक्षात आली आहे की जास्तीत जास्त लसीकरण करणं हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे”, असं आयएमएनं म्हटलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप अद्याप पूर्णपणे संपलेला नसतानाही देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन सर्सासपणे होत असल्याचं दिसून आल्याच्या मुद्द्यावरही आयएमएनं चिंता व्यक्त केली.

दरम्यान देशातील पर्यटन, तीर्थ यात्रा, धार्मिक उत्साह या सर्वांची आपल्याला आवश्यकता आहे हे देखील आयएमएनं मान्य केलं. पण यासाठी काही महिन्यांची वाट पाहिलेलं खूप चांगलं ठरेल. सध्या देशात काही पर्यटन स्थळावर कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलं आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर तिसरी लाट येणार हे निश्चित आहे. वेगानं कोरोना विरोधी लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे, असं आयएमएनं म्हटलं आहे.

शेअर करा
Exit mobile version