Site icon सक्रिय न्यूज

मायलेकी वाहून गेल्या, आई वाचली परंतु मुलीचा दुर्दैवी मृत्यू…..!

मायलेकी वाहून गेल्या, आई वाचली परंतु मुलीचा दुर्दैवी मृत्यू…..!

किल्लेधारूर दि.14  – धारुर (जि. बीड) तालुक्यातील कासारी बोडखा येथील मायलेकी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या. या घटनेत एक 17 वर्षीय तरुणीचा करून अंत झाला तर आई सुदैवाने वाचल्याची घटना सोमवार 12 जुलै रोजी रात्री सात वाजता घडली.पुष्पा बालाजी तिडके वय 17 वर्ष मयत मुलीचं नाव असून 12 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता शेतातून आपल्या आई मुक्ताबाई बालाजी तिडके (वय 35 वर्ष) सोबत घरी येत असताना पावसामुळे ओढ्याला पूर आला होता या पुरात मायलेकी दोघीही वाहून गेल्या.

                     सदरील घटनेत आईही जवळपास शंभर फूट वाहत गेली असताना एका झाडाच्या फांदीला आधार घेत ओढ्यातून बाहेर येत आश्चर्यजनक रित्या वाचली. परंतु तरुणी जवळपास तीन किलोमीटर अंतरावर वाहत गेली यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती तिडके कुटुंबांनी दिली. सदरील घटनेची माहिती ग्रामस्थांनी दिंद्रुड पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी धारूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. मयत तरुणीवर सायंकाळी बोडका येथे अंत्यविधी करण्यात आला.
              दरम्यान धारूर तहसीलच्या तहसीलदार श्रीमती वंदना शिडोळकर यांनी पीडित कुटुंबाची बुधवारी भेट घेतली. झालेली घटना दुर्दैवी असून यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांकडे अहवाल पाठवला आहे व पीडित कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी सांगितले. या घटनेत दिंद्रुड पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती दिंद्रुड पोलीस स्टेशनचे फौजदार विठ्ठल शिंदे यांनी दिली.
शेअर करा
Exit mobile version