जालना दि.१९ – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी सतर्कता बाळगली जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास 60 लाख व्यक्ती बाधित होतील, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.जालन्यात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलं की, कोरोनाची तिसरी लाट जर आली, तर राज्याला सुमारे 4 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते. पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत 40 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण 60 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. लक्षणं जास्त प्रमाणात दिसत नसली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही, असंही टोपे यांनी म्हटलं.