बीड दि.१९ – अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. बिल काढण्यासाठी चक्क प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे गायके यांना लाच स्वीकारण्याचा मोह रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आवरता आला नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अंगणवाडीना शासनाच्या योजनेप्रमाणे गॅस कनेक्शन देण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले होते.या एजन्सीला अंगणवाडीत प्रति गॅस कनेक्शन 6 हजार 533 रूपये 50 पैसे प्रमाणे 86 गॅस कनेक्शन देण्यात आले होते. या कामाचे 5 लाख 61 हजार 461 रुपये बिल काढण्यासाठी प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे असे 86 गॅस कनेक्शनचे 48 हजार 461 रुपये लाचेची मागणी बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके यांनी मागितली होती.मात्र त्यावर तडजोड करून 40 हजार रुपये लाच स्वीकारताना गायके यांना रंगेहात पकडण्यात आले. गायके यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर परंडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक मारुती पंडीत, पोलीस उप अधीक्षक प्रशांत सापते यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान गायके हे गेल्याच वर्षी शासकीय सेवेत रुजू झाले असून त्याचे वय 32 वर्ष आहे. तरुण व नव्याने सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच घेण्याचा मोह जडल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.