बीड दि.२० जिल्ह्यात आज कोरोनाचा आकडा वाढला असून जिल्हा प्रशासन कोरोना रोखण्यासाठी सातत्याने काम करत आहे. दुसरी लाट जिल्ह्यात कमी होत होती तर मागच्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णात घट झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. सध्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. मात्र दुसरीच लाट अद्याप पूर्णपणे संपली नाही यामुळे तिसऱ्या लाट येण्या अगोदरच आवश्यक त्या उपाययोजना प्रशासन करत आहे.
वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई या तीन तालुक्यात कडक निरबंध घातले आहेत तरी देखील कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात देखील कडक निर्बन्ध घालण्यात आले आहेत.
दरम्यान आज शिरूर तालुक्यात 42 रुग्णांची भर पडली आहे ही संख्या चिंता वाढवणारी असून यावर उपाययोजना म्हणून तालुक्यात सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजे पर्यंतच दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुपारी 1 च्या नंतर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या चालू आस्थापना चालु राहणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने देण्यात आले आहेत.