बीड दि.२० – जिल्हयात मागील काही दिवसांपासून मोटार सायकलसह मोबाईल चोरी जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याची बाब पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदरील घटनांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक नियुक्त केले होते. दरम्यान या पथकाने या घटनांचा पर्दाफाश करत चोरट्यांच्या गेवराईत मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून १ बोलेरो पिकअपसह २४ मोटारसायकल, ७ मोबाईल जप्त केले आहेत.
चोरीच्या घटनांचा शोध घेण्यासाठी नियुक्त पथक हे मंगळवार दि.२० रोजी आरोपींचा शोध घेत गेवराई तालुक्यातील गढी येथे असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेख एकबाल उर्फ अप्पू व त्याचा मित्र अजय राठोड दोन्ही रा.गेवराई हे दोघे दोन चोरीच्या मोटार सायकलसह गेवराई येथून गढीकडे येत आहेत. त्यानुसार या पथकाने गढी येथील उड़ान पुलाचे खाली सापळा लावून सदरील दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांनी मागील काही महिण्यात गेवराई तालुक्यातील चकलांबा, जालना , औरंगाबाद, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, कल्याण येथून मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केले.
24 मोटरसायकल सह एक बोलेरो आणि सात मोबाईल जप्त, बीड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई…..!
दरम्यान चोरलेल्या मोटार सायकलपैकी ३ मोटार सायकल गेवराई येथे अजय राठोड याच्या घरी, अन्य मोटारसायकल गावातील लोकांना फायनान्सच्या गाड्या दाखवून त्यांच्याकडून काही रक्कम घेवून व कागदपत्र दिल्यानंतर उर्वरीत रक्कम द्या, असे सांगून विकल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संबंधीत लोकांकडून या गाड्या हस्तगत केल्या असून एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.