नवी दिल्ली दि.२१ – भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या काठावर आहे. त्यातच आता चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेत भारतातील 67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटिबॉडी आढळल्याचा दावा करण्यात आलाय. दुसरीकडे अद्यापही 40 कोटी नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचंही स्पष्ट झालंय. ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी याबाबत माहिती दिली. जून-जुलैमध्ये 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांमध्ये हा सिरो सर्वे करण्यात आला. यात 6-17 वयोगटातील मुलांचाही समावेश होता. भार्गव म्हणाले, “आम्ही 7 हजार 252 हेल्थकेअर वर्कर्सचा अभ्यास केला. यात 10 टक्के लोकांनी लस घेतलेली नव्हती. यात एकूण 85.2 टक्के ‘सिरोप्रिव्हिलन्स’ (seroprevalence) आढळला.
डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “या सिरो सर्वेत सामान्य लोकसंख्येत 2/3 म्हणजे 6 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये SARS-CoV-2 संसर्ग होता. यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे यातील एक तृतीयांश लोकसंख्येत अँटीबॉडी नव्हत्या. म्हणजे देशात अजूनही 40 कोटी लोकसंख्या कोरोना संसर्गाच्या धोक्यात आहे. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं कोरोना संसर्गाचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करु शकतात.”
“6-9 वर्षांच्या मुलांमध्ये प्रौढांइतक्याच अँटीबॉडी आहेत. विशेष करुन तरुण मुलांमध्ये प्रौढांप्रमाणेच अँटीबॉडी एक्सपोजर आढळलं. काही देशांमध्ये प्राथमिक शाळा बंदच करण्यात आल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत भारतात शाळा सुरू करायच्या असतील तर आधी प्राथमिक शाळा सुरू कराव्या लागतील. प्राथमिकनंतर माध्यमिक शाळा सुरू कराव्या लागतील. मात्र, त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. शाळा सुरू होतील मात्र त्यासाठी काही निकषांची पुर्तता करावी लागेल,” असंही नमूद करण्यात आलं.
दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येतील घट आणि लहान मुलांमध्ये प्रौढांपेक्षा अधिकच्या अँटिबॉडी यामुळे लवकरच मुलांना शाळेत पाठवता येईल, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय. दुसरीकडे निती आयोगाचे सदस्य डॉ वीके पॉल म्हणाले, “अजूनही मोठ्या लोकसंख्येला कोरोना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा. ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेत त्यांनीच प्रवास करावा.”