Site icon सक्रिय न्यूज

गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी 25% अभ्यासक्रम कमी…….!

गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी 25% अभ्यासक्रम कमी…….!

मुंबई दि.२३ – देशातील कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शाळांनी विद्यार्थांचं ऑनलाईन शिक्षण सुरु केलं आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हिड – 19 च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातील विद्यार्थ्याना संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. राज्यात देखील ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादांमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती.

 

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे यावर्षीही शैक्षणिक वर्ष आँनलाईन पध्दतीने सुरु झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने २५% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे.

शेअर करा
Exit mobile version