मुंबई दि.२७ – राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं दिसतंय. परंतु, तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात पुर्वीचेच निर्बंध कायम ठेवले आहेत. तर दुसरीकडे रूग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. त्यावर आता मुख्यमंत्री निर्णय घेतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
राज्यात ठिकठिकाणी कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे, त्यामुळे काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, ते पुर्णपणे हटवण्यात आले नाहीत. याबद्दल टास्क फोर्स अभ्यास करत असून मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय जाहीर करतील, असं सुचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे.राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्हिटी रेट कमी झाला आहे. त्या जिल्ह्यातील लावण्यात आलेले निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करत आहे. टास्क फोर्स येत्या दोन दिवसात आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री निर्बंध कमी करण्याबाबतचा निर्णय घेतील, असं त्यांनी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार असल्याचं देखील त्यांनी याआधी सांगितलं होतं. त्यावर देखील मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स मिळून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.