पुणे दि.२७ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे यांनी राज्यातील पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलली असल्याची माहिती दिली आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्टला आयोजित केली जाईल. 8 ऑगस्ट ला राज्यात केंद्रीय पोलीस बलाची परीक्षा होत असल्याने परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकली होती.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे आता ही परीक्षा येत्या 8 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती आता ती 9 ऑगस्टला होईल. सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे 10 लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणं पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित केली जाणार होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर परीक्षा परिषदेने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागानं 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट लक्षात परीक्षा लांबणीवर टाकली गेली होती.