उस्मानाबाद दि.२८ – भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एका जणाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा अधिकारी जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास 1 लाख 10 हजाराच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितल्याचा आरोप आहे. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसिंग जानकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार आणि 20 हजार आरोपी जानकरने स्वीकारले.
तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्यांच्या पाहुण्यांचा जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली असून पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता.