बीड दि.२९ – कोरोना व्हायरसची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यातील ग्रामीण भागात शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या. मात्र शाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरु झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत 613 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, पॉझिटीव्हीटी रेट कमी असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.
राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे 5,947 शाळा 15 जुलैपासून पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या. 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत वर्ग सुरु करण्यात आले होते. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे नवे रुग्ण न आढळल्याने ग्रामीण भागात पुन्हा शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. राज्यात एकूण 19,997 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत. यात 8 वी ते 12 वी च्या वर्गात एकूण 45,07,445 विद्यार्थी शिकतात. यातील 19,997 शाळांपैकी ग्रामीण भागीतल 5,947 शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला असून यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही लाट नेमकी कधी येईल, याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे आणि जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्यक आहे.