Site icon सक्रिय न्यूज

अजित पवारांच्या बैठकीनंतर दोनच दिवसांत शासन आदेश जारी…..!

अजित पवारांच्या बैठकीनंतर दोनच दिवसांत शासन आदेश जारी…..!

मुंबई दि.१ – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील या मुद्यावरुन गदारोळ उडाला होता. दिवसेंदिवस परीक्षा लांबत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकारविरोधात रोष वाढत चालला आहे. अशातच आता राज्य शासनाने एमपीएससी परीक्षांबद्दल महत्वाचा निर्णय जारी केला आहे.

एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या विविध विभागातील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदे तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतीबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली तयार करुन 30 सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.28 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत एमपीएससीमार्फत भरवण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. अजित पवारांच्या या बैठकीनंतर अवघ्या दोनच दिवसात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून कोरोनामुळे भरती परीक्षा रखडल्या आहेत. तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करून घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता एमपीएससी परीक्षांबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखवल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

शेअर करा
Exit mobile version