पुणे दि.२ – राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (1 ऑगस्ट) महसुली सेवांबाबत मोठी घोषणा केलीय. यानुसार आजपासून महाराष्ट्रातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा (7/12) मिळणार आहे. यामुळे आता तलाठ्यांचा वेळ वाचेल आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असंही थोरातांनी नमूद केलं. ते पुण्यात बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “आज महसूल दिन त्यानिमित्ताने शुभेच्छा व या निमित्ताने काही सेवा सुरू करत आहोत. यामुळे सहजता, पारदर्शकता आणि बिनचूक सेवा सुरू होईल. सर्व सेवा ऑनलाईन असेल. सात बारा ऑनलाईन केलाय. आजपासून 7/12 नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. त्यासाठी खूप काम करावे लागले. मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आलीय. ई म्युटेशन सुद्धा पूर्ण होत आलेय, लवकरच मिळेल. 4 ठिकाणी जमिनी असतील तर एकच सातबारा मिळेल. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजीटल रुपात मिळतील. यामुळे तलाठ्याचा वेळ वाचणार आहे.”
दरम्यान, सात बारा काढण्यासाठी 15 रुपये रक्कम भरावी लागेल. बँकांसोबत करार करणार आहे. बँक पण सात बारा काढू शकतील. त्याचा नागरिक लाभ घेऊ शकतील. खोट्या नोंदी करता येणार नाही. फोटो आणि लोकेशन मिळेल. गैरप्रकार होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अडचणी आल्या तर आम्हाला समजलं पाहिजे. दोष समोर आले तर त्या त्या वेळी ते सोडवू,” असंही थोरातांनी नमूद केलं.