Site icon सक्रिय न्यूज

जिवंतपणी विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनी प्रेमीयुगलाचे स्मशानभूमीत लावले लग्न……!

जिवंतपणी विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनी प्रेमीयुगलाचे स्मशानभूमीत लावले लग्न……!
जळगाव दि.2 – भडगाव तालुक्यातील वाडे याठिकाणी एका प्रेमीयुगुलांनी मैत्रीदिनीच गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्यानं संबंधित प्रेमीयुगुलांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. जिवंतपणी मुलांचं प्रेम न कळालेल्या पालकांनी मात्र मृत्यूनंतर स्मशानभूमीत त्याचं लग्न लावून दिलं आहे. अग्निडाग देण्यापूर्वी दोघांच्या कुटुंबीयांनी संबंधित जोडप्याचं स्मशानभूमीत विधीवत लग्न लावून देत त्यांची लग्नाची इच्छा पूर्ण केली आहे. मैत्रीदिनीच जोडप्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुकेश कैलास सोनवणे (वय- 22) आणि नेहा बापू ठाकरे (वय-19) असं आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावं आहेत.
                    मृत नेहा आणि तिचे कुटुंबीय मागील काही महिन्यांपूर्वी आपल्या मामाच्या गावाला भडगाव तालुक्यातील वाडे याठिकाणी वास्तव्याला आले होते. याठिकाणी राहत असताना, नेहाची ओळख वाडे येथील रहिवासी असलेल्या मुकेशशी झाली. काही दिवसांनी त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि नंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. बाहेर फिरण्याचा बहाणा करत दोघंही एकमेकांना सतत भेटायचे. पण त्याच्या प्रेमाचं गुपित फार काळ गुप्त राहिलं नाही. दोघांत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना मिळाली. दोघंही एकाच समाजाचे होते. त्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांकडून मुलीच्या घरच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मुकेश हा नेहाचा नात्यानं चुलत मामा लागत असल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. यानंतर नेहाच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. त्यामुळे मुकेश आणि नेहाच्या प्रेमविवाहाचा आशा धुसर होत गेली. यातूनच मुकेश आणि नेहानं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3 ते 5 च्या दरम्यान वाडे येथे नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या इमारतीतील एका लोखडी सळईला गळफास लावून आत्महत्या केली आहे. मुकेशनं आत्महत्या करण्यापूर्वी स्टेटसला बाय असं लिहिलं होतं. यानंतर 1 ऑगस्ट रोजी सकाळी दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले होते. यावेळी घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही.
                       दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांची एकाच वेळी पण वेगवेगळी अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर कुटुंबीयांनी स्मशानभूमीतच दोघांचं विधीवत लग्न लावून दिलं आहे. यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. पोलिसांनी दोघांबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करून घेतली आहे. पोलीस या घटनेचा  तपास करत आहेत.

शेअर करा
Exit mobile version