Site icon सक्रिय न्यूज

तिसरी लाट थोपवायची असेल तर काळजी घ्यावी लागेल………!

तिसरी लाट थोपवायची असेल तर काळजी घ्यावी लागेल………!

मुंबई दि.४ – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तिसरी लाट थोपवायची असेल तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.  जगात स्पेन, युके, रशिया, इंडोनेशियामध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. भारतातल्या तिसऱ्या लाटेबाबत अद्याप अंदाज आलेला नाही. त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करायची असेल तर लसीकरण महत्वाचं आहे असंही राजेश टोपे म्हणाले.

राज्यात अनेक शहरांमध्ये लसींअभावी लसीकरण सातत्यानं बंद होत आहे. त्यावरही राजेश टोपे यांनी भाष्य केलं. केंद्र सरकार राज्याला ज्या लसी पुरवत आहे त्या प्रत्येक जिल्ह्याला सम प्रमाणात दिल्या जात आहेत. राज्य सरकारकडून नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जात आहे. मात्र, लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने अडथळा येत असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. त्यामुळे त्वरित लसींचे डोस मिळावेत यासाठी केंद्राला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिथे रुग्णसंख्या जास्त आहे तिथे लसींची संख्याही वाढवून दिली जात असल्याचंही टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान राज्यात सध्या 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढच्या काही दिवसांत अनेक सण येऊन ठेपले आहेत. यानंतर कोरोनाचे परिणाम जाणवतील, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन टोपेंनी केलं आहे.

शेअर करा
Exit mobile version