मुंबई दि.६ – राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होत आहे. सध्या 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने केल्या आहेत.
राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 15 जुलैपासून राज्यातील किती शाळा सुरु झाल्या याची माहिती दिली होती. 15 जुलै रोजी राज्यातील शाळांत इ. 8 वी ते इ. 12 वी पर्यंतचे वर्ग भरवण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण शाळांची संख्या व त्यापैकी किती शाळा उघडल्या तसेच जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या व त्यापैकी किती विद्यार्थी शाळेत आले, याची माहिती ट्विटरवरुन शेअर केली आहे.
राज्यात एकूण शाळांची संख्या 19997 असून त्यापैकी 5947 शाळा उघडण्यात आल्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 45,07,445 असून त्यापैकी 4,16,599 विद्यार्थ्यांनी शाळेत आपली हजेरी नोंदवली, असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, मुंबई, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, सातारा, मुंबई मनपा या ठिकाणी एकही शाळा सुरु झालेली नाही. सर्वाधिक शाळा कोल्हापूरमध्ये 940 तर औरंगाबादमध्ये 631 शाळा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांनी होकार दर्शवला आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर समोर आली आहे.