केज दि.६ – घरी एकटीच असलेल्या महिलेस पाणी पिण्यास द्या असा बहाणा करीत घरात विनयभंग केला. महिलेने विरोध केल्याने तिला मारहाण केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय महिला ही २५ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी असताना सुशेन अवधूत केदार ( रा. एकुरका ता. केज ) हा घरी गेला. पिण्यास पाणी मागून घरात घुसून सुशेन केदार याने वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. त्यानंतर ३० जुलै दुपारी १ वाजेच्या सुमारास या महिलेचा पाठलाग करून घरात पुन्हा विनयभंग करू लागल्याने महिला ओरडू लागल्याने ढकलून दिले. तर सुशेन केदार, त्याची पत्नी अश्विनी केदार, आई राहीबाई केदार यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून सुशेन केदार, अश्विनी केदार, राहीबाई केदार या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे करीत आहेत.
केज शहरातून दोन दुचाकी चोरल्या
घरासमोर लावलेल्या ४५ हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना केज शहरातील रोजा मोहल्ला व समता नगर भागात दोन रात्रीत घडल्या. याप्रकरणी केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील खाजगी वाहन चालक दिपक सर्जेराव नखाते हे केज शहरातील समता नगर भागात सध्या वास्तव्यास असून त्यांनी २५ हजार रुपये किंमतीची फॅशन प्रो हिरो कंपनीची दुचाकी ( एम. एच. ४४ एल ३०९९ ) ५ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास समता नगर भागातील राहत्या घरासमोर लावून घरात झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दीपक नखाते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार प्रभाकर नखाते हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत शहरातील रोजा मोहल्ला भागातील फारोकी मजीदजवळ वास्तव्यास असलेले अकबर कादर शेख यांनी २० हजार रुपये किंमतीची हिरो होन्डा स्प्लेंडर कंपनीची दुचाकी ( एम. एच. २३ जे ४२६० ) ३ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता हँडल लॉक करून घरासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या दुचाकीचे हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास केली. अकबर शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे करीत आहेत.
विनाकारण शिवीगाळ करीत वृद्धाचे डोके फोडले
शेताच्या बाजुला पाझर तलावाजवळ उभ्या असलेल्या वृद्धास विनाकारण शिवीगाळ करीत लाथाबुक्याने व काठीने बेदम मारहाण करून डोके फोडल्याची घटना केज तालुक्यातील लिंबाचीवाडी येथे घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लिंबाचीवाडी येथील प्रभू माधव माने ( वय ६५ ) हे ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या पाझर तलावाजवळ उभे असताना बापूराव अंकुश ठोंबरे याने तिथे येऊन ऐ म्हताऱ्या तु येथे काय करतोस असे म्हणत विनाकारण शिवीगाळ करू लागला. तु मला शिव्या देवु नकोस असे म्हणताच बापूराव याने लाथाबुक्याने व काठीने मारहाण करीत डोके फोडून गंभीर दुखापत केली. अशी फिर्याद प्रभू माने यांनी दिल्यावरून बापूराव ठोंबरे यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मुकुंद ढाकणे हे करीत आहेत.