Site icon सक्रिय न्यूज

30 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेले वीज ग्राहक संशयाच्या यादीत……!

30 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेले वीज ग्राहक संशयाच्या यादीत……!

मुंबई दि.९ – महिन्याला 30 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेले घरगुती वीज ग्राहक संशयाच्या भोवऱयात अडकले आहेत. संबंधित वीज ग्रहकांचा वीज वापर एवढा कमी कसा काय? असा प्रश्न महावितरणला पडू लागला आहे. कमी वीज वापर असलेले ग्राहक वीज चोरून तर वापरत नाहीत ना ? अशी शंका महावितरणला येऊ लागली आहे. त्यामुळे कमी वीज वापर असलेल्या सर्वच ग्राहकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वीज वापराबाबत खातरजमा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

महावितरणचे राज्यात एक कोटी 83 लाख घरगुती वीज ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास 20 टक्के म्हणजे 30-35 लाख ग्राहकांचा मासिक वीज वापर अल्प म्हणजे 30 युनिटपेक्षा कमी असल्याचे मीटर रीडिंगमधून समोर आले आहे.लॉकडाऊनमुळे मोठय़ा संख्येने नागरिक घरात बसून आहेत, तर अनेकजण घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होणे अपेक्षित होते. तरीही 20 टक्के ग्राहकांचा वीज वापर एवढा कमी कसा काय आहे, असा प्रश्न महावितरणला पडला आहे. त्यामुळेच कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या घरी भेट देऊन वीज चोरी होत आहे का, वीज मीटरमध्ये छेडछाड, मीटर नादुरुस्त आहे का या अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश प्रादेशिक कार्यालयांना दिले असल्याची माहिती महावितरणच्या एक वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. तसेच वीज चोरी आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याबाबत बजावले आहे.

दरम्यान, वीज मीटर नादुरुस्त असेल तर ग्राहकाचा वीज वापर कमी किंवा जास्त नोंदला जातो. वीज वापर कमी असताना मीटर नादुरुस्त असल्याने ग्राहकाला जेव्हा जास्त बिल येते तेव्हा ग्राहक तत्काळ तक्रार करतात. पण जेव्हा कमी बिल येते तेव्हा ग्राहक कोणतीही तक्रार करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते. त्याची दखल घेत नादुरुस्त असलेले वीज मीटर तत्काळ बदलावेत अशा सूचना महावितरणने संबंधित अधिकाऱयांना दिल्या आहेत.

शेअर करा
Exit mobile version