मुंबई दि.१० – महाराष्ट्र सरकारला दणका देत मुंबई हायकोर्टाने अकरावी प्रवेशसाठी 21 ऑगस्ट 2021 रोजी होणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. राज्य सरकारनं सीईटी संदर्भात 28 मे रोजी एक अध्यादेश काढला होता. तो अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारला संदर्भात हायकोर्टाने अकरावी मध्ये प्रवेश दहावी मध्ये मिळालेल्या गुणांनुसारच करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकार तर्फे निकालाला स्थगिति देण्याची केलेली मागणी ही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
एवढंच नव्हे तर हायकोर्टाने राज्य सरकारनं 48 तासात या निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असा निर्देश दिला आहे. पुढील सहा आठवड्यांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. यापूर्वी झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी सीईटी बाबत सरकारची बाजू मांडली होती आणि सीईटी प्रवेश परीक्षा घेण्याबाबतची माहिती न्यायालयात दिली होती. खरतर राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत 28 मे 2021 रोजी एक अध्यादेश जारी केला होता. मात्र, सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने करत मुंबई उच्च न्यायालयात तिचे वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर आज न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 28 मे 2021 रोजी जारी अध्यादेश रद्द करण्यात आला आहे. 11 प्रवेश साठी सीईटी परीक्षा होणार नसून येणाऱ्या 6 आठवड्यात 11 प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्देश राज्य सरकारला हायकोर्टाने दिला आहे.