Site icon सक्रिय न्यूज

शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या अन्यथा…….!

शाळा सुरू करण्यास प्राधान्य द्या अन्यथा…….!

नवी दिल्ली दि.११ –  जगभरातल्या देशांनी शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केलं आहे. कोरोना काळामुळे गेल्या वर्षीच्या मार्चपासून जगभरातील शाळा बंद आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी सांगितलं.

                   शाळा बंद राहिल्याने मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असून यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर,अंतर्गत गर्दी टाळणे, हाताची स्वच्छता ठेवणे आणि शिक्षकांचे लसीकरण या गोष्टींसह शाळा सुरु करण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी असं आवाहन डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटरवरुन केलं आहे. भारतात गेल्या मार्चपासून शाळा बंद आहेत. पण काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.

             दरम्यान, कोरोना मुक्त गावांमध्ये 15 जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. तर शहरी भागांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व इतर शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त यांना अधिकार असणार आहे. तर 11 जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.

शेअर करा
Exit mobile version