बीड दि. 12 – जिल्ह्यातील कथित नरेगा घोटाळ्याच्या चौकशीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २ ऑगस्ट रोजी दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने रवींद्र जगताप यांच्या जागी हिंगोलीचे सीईओ राधाबिनोद अभिराम शर्मा यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
राधाबिनोद शर्मा हे आज जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केलेल्या जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यावर उच्च न्यायालयाने नरेगाच्या चौकशीत दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांची बदली करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. तसेच १८ ऑगस्ट रोजी आम्ही नवीन जिल्हाधिकाऱ्यांना नरेगाच्या चौकशीच्या बाबतीतले नवीन आदेश देऊ असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे त्या अगोदरच नवीन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होईल हे स्पष्ट होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी बीडच्या जिल्हाधिकारीपदी हिंगोली जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद अभिराम शर्मा यांच्या नियुक्तीचे आदेश आले आहेत. एक धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, राधाविनोद शर्मा हे २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी २०१४-२०१९ ही पाच वर्षे त्यांच्या स्वतःच्या राज्यात म्हणजे मणिपूरमध्ये सेवा केली आहे. त्यानंतर त्यांची मंत्रालयात ग्रामीण विकास विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच सध्या ते हिंगोली येथे जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत होते.