Site icon सक्रिय न्यूज

डॉक्टरसह सुरक्षा रक्षकांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल…….!

डॉक्टरसह सुरक्षा रक्षकांना मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल…….!
अंबाजोगाई दि. 12 – अपघातात जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.०९) रात्री उशिरा घडली होती. या घटनेमुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली होती. अखेर या प्रकरणी चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
                    स्वाराती रुग्णालयातील सुरक्षा परिवेक्षक रघुनाथ साबळे यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजता रस्ता अपघातात जखमी झालेल्या गणेश वैजनाथ मुंडे (वय २५, रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) या तरुणास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात आणले होते. यावेळी कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी सुमीत शृंगारे यांनी जखमी गणेशवर प्राथमिक उपचार करून संबंधित विभागाच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. दरम्यान, रुग्णासोबत असलेल्या मित्र आणि नातेवाईकांनी अपघात विभागातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना पूर्वकल्पना न देता गणेशला पुढील उपचारासाठी तिथून केसपेपर न घेता घेऊन गेले. त्यानंतर ११ वाजताच्या सुमारास ते पुन्हा रूग्णासह परतले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून गणेश मयत झाल्याचे नातेवाईकांना सांगितले.
            तुमच्या निष्काळजीपणामुळेच गणेशचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत नातेवाईकांनी डॉक्टरांना जोरदार शिवीगाळ करत मृतदेह हलवण्यास नकार दिला. यावेळी माणिक मारोती मूंडे, श्रीकांत चाटे, स्वप्निल ओहाळ व अन्य एकाने गोंधळ घालून अपघात विभागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यावेळी मयत गणेशच्या भावाने दिनकर बारगजे या रक्षकाच्या हाताला चावा घेतला, परंतु स्वेटर घातले असल्याने त्यांना जखम झाली नाही. मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास मृतदेह शवगृहात हलवण्यात आला. त्यानंतर पहाटे २.३० वा. गणेशच्या भावाने अचानक येत डॉ. सुमीत शृंगारे यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. सूरक्षारक्षक दिनकर बारगजे यांनी त्याला डॉक्टरपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या इतर नातेवाईकांनी बारगजे यांना बाहेर ओढत नेऊन शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी सुरक्षा परिवेक्षक साबळे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याही गचुरीला धरून शिवीगाळ केली. सदर फिर्यादीवरून माणिक मारोती मूंडे, श्रीकांत चाटे, स्वप्निल ओहाळ व अन्य एकावर शासकीय कामकाजात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी करत आहेत.
                  मारहाणीची घटना घडून आणि संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उलब्ध असतानाही दोन दिवस उलटले तरी आरोपींना अटक केली नसल्याबद्दल ‘मार्ड’ने नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयात निर्माण झालेल्या भितीदायक वातावरणामुळे निवासी डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने आणिबाणीच्या परिस्थितीसाठी रेड अलर्ट सिस्टीम लावणे,  रुग्णालयातील पोलीस चौकीला रुग्णालयाच्या इंटरकॉमशी जोडणे आदी उपाययोजना कराव्यात असे मार्डने सुचवले आहे.
                   दरम्यान, भविष्यात अशा घटना रुग्णालयामध्ये घडल्यास रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. अपघात विभागामध्ये अशा अप्रिय घटना घडल्यास याबाबत सर्व डॉक्टर व कर्मचारी यांना माहिती होण्यासाठी त्याठिकाणी अलार्म सिस्टीमची सोय आहे किंवा नाही याची पाहणी करुन अलार्म सिस्टीम बसविण्याबाबत व योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिले आहेत.
शेअर करा
Exit mobile version