पुणे दि.१३ – राज्यातल्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची ओढ लागली आहे. ऐन श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्यामुळे पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार येत्या १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दोन्ही तारखांना हवामान खात्याने यलो अलर्ट जरी केला आहे.
यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिनांक 16 रोजी वर्तवली आहे.तर दिनांक 17 रोजी मात्र औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, पुणे, सांगली, आणि कोल्हापूर या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.