Site icon सक्रिय न्यूज

जनावरे चारण्यावरून दोन गटात हाणामारी….!

जनावरे चारण्यावरून दोन गटात हाणामारी….!
केज दि.१५ – शासकीय गायरान जमिनीत जनावरे चारण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत एकाचा गळा आवळून तर दुसऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज तालुक्यातील लाडेगाव येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या दहा जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
       लाडेगाव येथील रामधन बाबाजी धिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सर्वे नं. १४३ मधील गायरान जमिनीतील पीक जगजिवन विठ्ठल अंबाड हे गायीस चारीत असताना रामधन धीरे यांनी गायीस पीक का चारतोस अशी विचारणा केली. त्यावरून जगजीवन अंबाड, विवेकानंद जगजीवन अंबाड, श्रीकांत जगजीवन अंबाड या तिघा बापलेकांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करीत गचुरे धरून खाली पाडले. रामधन धीरे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून जाळून मारण्याचा प्रयत्न करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद रामधन धीरे यांनी दिल्यावरून जगजीवन अंबाड, विवेकानंद अंबाड, श्रीकांत अंबाड या तिघा विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ भादविसह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केजचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. लगारे हे पुढील तपास करीत आहेत.
         दुसऱ्या गटाचे जगजीवन विठ्ठल अंबाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते गायरान जमिनीत गायी चारण्यास गेले असता रामधन बाबाजी धिरे, दिपक रामधन धिरे, लक्ष्मण भिमा धिरे, सतिष एकनाथ धिरे, सुनिल एकनाथ धिरे, विशाल सुनिल धिरे, श्रावण बालु धिरे यांनी तू गायरान जमिनीत जनावरे चारण्यास घेऊन का येतोस असे म्हणत त्यांच्या अंगावरील गमजा घेऊन गमजाने गळा आवळुन जगजीवन अंबाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे खिशातील ७ हजार ५०० रूपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अशी फिर्याद जगजीवन अंबाड यांनी दिल्यावरून दिपक धिरे, लक्ष्मण धिरे, सतिष धिरे, सुनिल धिरे, विशाल धिरे, श्रावण धिरे या सात जणांविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३९५, ३२३, ५०४, ५०६ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे हे पुढील तपास करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version