Site icon सक्रिय न्यूज

मातंग समाजाला एकत्र करून प्रगती साधण्याचा प्रयत्न – प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे…….! 

मातंग समाजाला एकत्र करून प्रगती साधण्याचा प्रयत्न – प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे…….! 
केज दि.२३ – मातंग समाजाची तरुण पिढी शिक्षणापासून दूर राहत असून समाज बांधव अज्ञानामुळे अंधश्रद्धेत गुरफटले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उद्योग, व्यवसाय करण्यासाठी भागभांडवल मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. समाजाला एकत्र आणून त्यांना प्रगतीच्या वाटेवर नेण्याचे धोरण बहुजन रयत परिषदेने आखले आहे. असे प्रतिपादन परिषदेचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले.
      साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने १८ जुलै पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नवनिर्धार संवाद अभियान सुरू आहे. तर शनिवारी केज शहरात अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळाव्यात बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे हे बोलत होते. यावेळी माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे ( ढोबळे) यांची प्रमुख उपस्थिती होती.
         पुढे बोलताना रमेश गालफाडे म्हणाले की, मातंग, मोची, डोलार, चांभार, ढोर व धनगर समाजाला संघटित करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी जनजागृती करीत आहोत. महाराष्ट्रात फिरून या समाजाचे प्रश्न, अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शासनाकडून मिळत असलेल्या  विकासात्मक योजना वंचित व दुर्लक्षित कुटुंबाला मिळवून देण्यासाठी पाठपुरवठा केला जाणार आहे. समाजाला न्याय मिळवून संघटन निर्माण केले जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नसलेल्या मजुरांना मुख्यमंत्र्यांनी सरसगट १० हजार रुपयांची मदत घ्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत. पुढच्या वर्षीपासून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार देण्यात येणार असून सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा शासन या पुरस्कारासाठी जेवढी रक्कम देते तेवढी रक्कम देऊन सन्मान केला जाणार आहे. मातंग समाजातील जो विद्यार्थी इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेईल, त्यास शिष्यवृत्ती सुरू करणार असल्याचे सांगून केज शहरात पतसंस्था सुरू करून बचत गटाच्या महिला, हातगाडे चालकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
       यावेळी लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, सवलतीचे पाणी पुलाखालून वाहून गेले. मात्र अनेक जातीना त्याचा लाभ झाला नाही. त्यामुळे विकासापासून उपेक्षित घटक दूर राहिला आहे. शासनाकडून साखर संघाला लगेच मदत होते. मात्र सर्व महामंडळाचे कर्ज वाटप बंद आहे. महामंडळे ही कर्मचारी पोसण्यासाठी आहेत, की सर्वसामान्यांच्या आधारासाठी आहेत असा प्रश्न उपस्थित करून नावनिर्धार संवाद अभियानातून समाजाचे वैचारिक प्रबोधन करीत आहोत. त्यातून समाज जागृती होत असून समाजाचे देणं फेडण्यासाठी हे काम सुरू आहे. तर कोमल साळुंखे म्हणाल्या की, अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिका कथेला व्यापून टाकतात. मातंग समाजातील स्त्रीने कथेतील नायिकेप्रमाणे निर्भीड होऊन जगले पाहिजे. महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. मातंग समाजाला अ ब क ड प्रमाणे आरक्षण देण्याची मागणी आहे. अभियानाच्या माध्यमातून आठ हजार किमीचा प्रवास झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात बहुजन समाजासाठी दौरा काढला असून अडीअडचणी जाणून घेत आहोत असे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाला रमेश पाटोळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
शेअर करा
Exit mobile version