धारूर दि.23 – तालूक्यात सोमवारी दुपारी पावसाने चांगलीच जोरदार हजेरी लावली. जहागीरमोहा येथे वीज पडल्याने एका शेतकऱ्यांचे दोन जनावरे दगावले तर अंबेवडगाव परिसरात जोरदार पावसामुळे ज्वारी व बाजरीची पिकं आडवी झाली. दरम्यान, रात्री आठनंतर पुन्हा पावसाची दमदार सुरुवात झाली.
धारूर तालूक्यात सोमवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. डोंगरपट्ट्यात हा पाऊस विजेच्या कडकडाटासह कोसळला. जहागिर मोहा येथे दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास वीज पडून शेतकरी आबासाहेब लंगे यांची जहागीरमोहा माळावर चरणारे एक बैल व एक गाय जागेवरच मृत पावले. तर अंबेवडगाव परिसरात ज्वारी व बाजरीची चांगली आलेली पिके आडवी झाली होती. बऱ्यापैकी आलेल्या पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात बऱ्याच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिके सुकू लागली होती. यातच आज ठिक पाच वाजता पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. हाताची आलेली पिके जातात की काय या भीतीपोटी शेतकरी चिंतातुर असताना आज पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे या परिसरामधील शेतकरी आनंदित झाला असून बऱ्याच ठिकाणी डाळिंब बागेमध्ये पाणी साठलेले दिसत आहे. तर हातातोंडाशी आलेली बाजरीचे पीक, ऊस जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे भुईसपाट झालेली दिसून आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु होता. चार दिवसानंतर आज सकाळी सुर्यदर्शन होवून वातावरणात चांगलाच उकाडा जाणवला. दुपारी अचानक तालुक्यात सर्वत्र वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असला तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला आहे.