Site icon सक्रिय न्यूज

भाजपनेते नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश…….!

भाजपनेते नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश…….!

नाशिक दि.24 – भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकण पट्टा पिंजून काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.                   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्यची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

शेअर करा
Exit mobile version