Site icon सक्रिय न्यूज

नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडले तर पुण्यात कार्यालयात सोडल्या कोंबड्या……!

नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडले तर पुण्यात कार्यालयात सोडल्या कोंबड्या……!

पुणे दि.24 – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच नारायण राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे याठिकाणी वातावरण चांगलेच तापले आहे. तत्पूर्वी मुंबईत पहाटेच्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आली होती. बईतील दादर टीटी भागात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला होता. त्यावर “कोंबडी चोर !!!” असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. मात्र, पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर हा बॅनर तातडीने हटवण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयच फोडले आहे. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे. जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version