केज दि.२४ -बसमध्ये चढत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत काढून घेतल्याची घटना ताजी असतानाच
बसमधून प्रवास करीत असलेल्या महिलेच्या बॅगमधील दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना केज – कळंब बसमध्ये घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील ढाकेफळ येथील अनुराधा सुनिल थोरात ( वय ३५ ) ही महिला माहेरी भाट शिरपुरा ( ता. कळंब ) येथे गेल्या होत्या. २३ ऑगस्ट सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास कळंबहुन केज – कळंब बसने केजकडे येत असताना साळेगाव ते केज शहरातील कळंब चौक या अंतरात अज्ञात चोरट्यांनी बॅगमधील गंठण, नेकलेस, कानातील झुंबर ( किंमत ९९ हजार ६०० रुपये ) हे दागिने काढून घेत निघून गेले. २४ ऑगस्ट रोजी अनुराधा थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार प्रभाकर नखाते हे करीत आहेत. दरम्यान, केज बसस्थानक आणि शहरातून जाणाऱ्या बसमध्ये दागिने चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याने शहरात महिलांच्या अंगावरील दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
देवदर्शन घेत असताना लॉकेट तोडून घेतले
तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे तिघांनी दीड तोळ्यांचे लॉकेट काढून घेत पोबारा केल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील समता नगर भागात वास्तव्यास असलेले बाबासाहेब रामा बिक्कड हे २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास उत्तरेश्वर पिंप्री येथे देवदर्शनासाठी गेले होते. मंदिरासमोर गर्दी करून या गर्दीमध्ये अनोळखी तीन व्यक्तींनी त्यांना धक्का देऊन बाबासाहेब बिक्कड यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे ७३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट तोडून घेत पोबारा केला. बाबासाहेब बिक्कड यांच्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक अमोल गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, संतोष अशोक जाधव ( रा. गांधी नगर बीड ) या संशयितास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.