महाड दि.२५ – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांच्या जामीन अर्जावर महाड न्यायालयात सुनावणी झाली.यावेळी न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याप्रकरणी राणे यांना मंगळवारी दुपारी पोलिसांनी अटक केली होती .
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मंत्री राणे यांनी महाड मध्ये पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.त्यानंतर राणे यांच्याविरुद्ध राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले होते.विशेषतः मुंबई, कोकण भागात शिवसेना विरुद्ध भाजप आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
राणे यांच्या अटकेनंतर त्यांना रात्री उशिरा महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.त्यानंतर राणे यांना महाड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राणे यांना जामीन मंजूर केला .त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.यावेळी राणे यांच्यासोबत माजी आ प्रसाद लाड,आ नितेश राणे,निलेश राणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .
राणेंच्या जामिनानंतर आता भाजप नेत्यांकडून हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. तसेच भाजप नेते राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तर हे राज्य गुडांच्या मदतीने सुरु असल्याचा आरोप करत मंत्री अनिल परब यांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले. राणे यांना अटक करण्यासाठी दबाव टाकला जात होता, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी वरील माहिती दिली.