केज दि.२६ – केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागच्या कांही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू म्हणून लागणाऱ्या गॅस, पेट्रोल तसेच डिझेल च्या किमती वाढतच चालल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमतीमुळे गृहिणींसाह सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी केज तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष संजीवनी देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोना काळात लाखो लोकांचे हातचे काम गेले आहे. रोजगार मिळणे कठीण झाले आहे. परंतु हे सर्व होत असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. या सर्व बाबीला केंद्र सरकार जबाबदार असून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असतानाही केंद्र सरकार कांहीच करताना दिसत नाही. त्यामुळे येत्या 31 ऑगस्ट रोजी दरवाढीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, बीड जिल्हा समन्वयक प्रज्ञा खोसरे, जिल्हा निरीक्षक वैशाली पाटील, जिल्हाध्यक्ष संगीता तुपसागर यांच्या मार्गदर्शनाखाली केज तहसिल समोर गॅस सिलेंडरची पूजा करून भाववाढीचा निषेध नोंदवण्यात येणार असून तालुक्यातील गृहिणींनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संजीवनी देशमुख यांनी केले आहे.