Site icon सक्रिय न्यूज

50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या महसुली मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ…….!

50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या महसुली मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ…….!
बीड दि. २९ – बीड जिल्ह्यात जुलै महिन्यात सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने 25-30 दिवसांची उघडीप घेतल्याने अनेक महसुली मंडळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यात विहीत मुदतीच्या आत पिक विमा नुकसान भरपाईची आगावू रक्कम देण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर रक्कम  अदा करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनास आढावा बैठक प्रसंगी केल्या होत्या.
                 तरतूदीनुसार पात्र ठरलेल्या पिक विमा धारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५% आगाऊ रक्कम त्यांचे खात्यात विहीत मुदतीच्या आत  भारतीय कृषि विमा कंपनीने जमा करावी अशीे अधिसूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दि. २७ आॅगस्ट २०२१ रोजी जारी केली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना जिलास्तरीय संयुक्त समिती अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी बीड यांनी अधिसुचनेद्वारे सदर आदेश दिले आहेत . राज्य शासनाने 29 जून 2020 रोजी घेतलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
                    जिल्ह्यात  पहिल्यांदाच कपाशीपेक्षा जास्त  सोयाबीनची मोठ्या प्रमाणात जवळपास  ३ लाख हेकटर पेरणी झाली तर मूग व उडीद पिकांची 70 हजार हेकटरच्या जवळपास पेरणी झाली आहे. या खरीप पिकांच्या वाढीच्या अवस्थेत असताना पावसाचा मोठा  खंड पडला या मुळे उत्पादनावर परिणाम झाला. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती [Mic Season Adversity) नुकसान भरपाई निश्चित करणसाठीे या तरतूदीनुसार बीड जिल्हयातील अधिसूचित विमाक्षेत्र घटकातील सोयाबीन, उडीद व मुग या अधिसूचित पिकांचे  पेरणी, पिक परिस्थीती अहवाल, पर्जन्यमान अहवाल, स्थानिक प्रसार माध्यमांचे अहवाल, दुष्काळ सदृष्य परिस्थीती आधारे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाच्या ५० % पेक्षा कमी असल्याचे निर्दशनास आल्यामुळे नुकसान भरपाईस पात्र असल्याचे निश्चित केले आहे. सोयाबीन पिकाबाबत तालुका अंबाजोगाई व माजलगाव मधील अधिसुचित महसुल मंडळामध्ये फेर सर्वेक्षण करून ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान असलेल्या महसूल मंडळासाठी स्वतंत्र अधिसूचना निर्गमित करण्यात येणार आहे.
                     पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. 2019 मध्ये कोणत्याही पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात निविदा प्रक्रियेत भाग न घेतल्यामुळे बीड जिल्हा पीक विम्यापासून वंचित राहिला होता, मात्र ना. धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम 2020 मध्ये राज्य व केंद्र स्तरावर सतत पाठपुरावा करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारतीय पीक विमा कंपनी मिळवून दिली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी आमचे सरकार नेहमीच कटिबद्ध असून, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने महिनाभर उघडीप घेतल्याने होणाऱ्या नुकसानीत दिलासा देण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. खरीप हंगाम आढावा बैठक तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर,आमदार बाळासाहेब आजबे तसेच आमदार संजय दौड व इतर सर्वच लोकप्रतिनिधींनी याबाबत आग्रही मागणी केली होती.
                     अधिसुचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन, उडीद व मुग या अधिसूचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५% आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई, स्टॉक एक्सचेंग टॉवर्स, २० मी मंजील, पूर्व खंड, दलाल स्ट्रीट, फोर्ट मुंबई यांना हे आदेश देण्यात आले आहेत. आदेशानुसार पिक विमा कंपनीने ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून आगाऊ रक्कम त्यांचे खात्यात जमा करावी. अधिसूचित क्षेत्रातील सोयाबीन, उडीद व मुग पिक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर अधिसूचित विमा क्षेत्रातील या पिक हंगामाचे शेवटी उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी देखील पात्र राहणार असून अंतिम नुकसान भरपाईतून आगाऊ अदा केलेली रक्कम समायोजीत करण्यात येण्यात यावी असे सूचित केले आहे .
                              दरम्यान, या आदेशानुसार जिल्ह्यातील बीड ,पाटोदा, आष्टी, गेवराई, परळी, केज, शिरूर कासार, वडवणी, धारूर या तालुक्यातील सर्वेक्षण झालेल्या सर्व महसुली मंडळातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना ही आगाऊ  रक्कम मिळणार आहे.
शेअर करा
Exit mobile version