मुंबई दि.२९ – केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.
राजेश टोपे म्हणाले, केरळ राज्यातील ओनम सणामुळे वाढलेला कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राने राज्याला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केलीय. आगामी काळात राज्यातील सणवार पाहता या बाबत काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत तिथे शाळा सुरू होऊ शकतात का याची चाचपणी करतोय. 5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राइव्ह घेण्यात येणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात काही प्रमाणात घट आली असली तरी केरळात मात्र कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी राज्यात नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, केरळात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या 40 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. यापैकी जास्त रुग्णांची नोंद ही महाराष्ट्र आणि केरळात करण्यात येत आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाईट कर्फ्यू लावण्यावर विचार करण्यास सांगितलं होतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केरळात अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याचं कारण काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेला ओनमचा सण आहे.